˙˙जय मुक्ताई ..

Sunday, 23 October 2016

गीता प्रवचने अध्याय १ / ६

गीता प्रवचने अध्याय १ / ६

    अर्जुन रणांगणावर उभा राहिला तो कृतनिश्च्याने आणि कर्तव्यभावनेने उभा राहिला होता. क्षात्र-वृत्ति त्याच्या स्वभावात होती. युद्ध टाळण्याचा शिकस्त प्रयत्न करुण ते टळले नव्हते. कमीत कमी मागणी व कृष्णासारख्याची मध्यस्थी दोन्ही वाया गेल्या होत्या. अशा स्थितीत देशोदेशींचे राजे जमवून आणि कृष्णाला सारथ्य प्तकरायला लावून तो रणांगणावर उभा राहतो आणि वीर-वृत्तीच्या उत्साहाने कृष्णाला म्हणतो, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेवुन उभा कर, म्हणजे कोण माझ्याबरोबर लढण्यासाठी जमले आहेत त्यांची तोंडें एकदा मी पाहून घेतो. कृष्ण त्याच्या म्हणण्याप्रमाणे करतो आणि अर्जुन सभोवार नजर फिरवितो, तो त्याला काय दिसते? दोन्ही बाजूंना आपल्याच नातेवाईकांचा,सगेसोयऱ्याचा प्रचंड मेळावा उभा आहे. आजे,बाप,मुले,नातू-आप्तसंबंधाच्या चार पीढ्या मारण-मरणाच्या अंतिम निश्च्याने एकत्र झाल्या आहेत असे त्याला दिसते. ह्या गोष्टीची कल्पना आधी त्याला नसेल असे नाही. पण प्रत्यक्ष दर्शनाचा एक वेगळाच परिणाम असतो.तो सारा स्वजनसमूह पाहून त्याच्या हृदयाची कालवाकालव सुरु होते.

    त्याला फार वाईट वाटते.  आजपर्यंत त्याने अनेक लढायांत असंख्य विरांचा संहार केला होता. त्या वेळी त्याला वाईट वाटले नाही. त्याचे गांडीव गळून पडले नाही, त्याच्या शरीराला कापरे भरले नाही, त्याचे डोळे ओले झाले नाहीत; मग आत्ताच असे का? त्याच्या ठिकाणी अशोकाप्रमाणे अहिंसावृत्तीचा उदय झाला होता? नाही ही सारी स्वजनासक्ति होती.आजच्या घटकेलाहि जर समोर गुरु,बंधु,आप्त नसते तर त्याने शत्रुंची मुंडकी चेंडुप्रमाणे उडविली असती. पण आसक्तिजन्य मोहाने त्याची कर्तव्यनिष्ठा ग्रासली. आणि मग त्याला तत्वज्ञान आठवले. कर्तव्यनिष्ठ मनुष्य मोहग्रस्त झाला तरी नागडी कर्तव्यच्युति त्याला सहन होत नाही. तो तिला एखादा सद्विचार नेसवितो. अर्जुनाचे असेच झाले. तो आता युद्धच मुळात पाप आहे असे उसने प्रतिपादन करू लागला. युद्धाने कुलक्षय होईल,धर्म लोपेल,स्वैराचार माजेल,व्यभिचार-वाद पसरेल,दुर्भिक्ष ओढ़वेल,समाजावर संकटे येतील असे अनेक मुद्दे तो कृष्णालाच समजावून सांगू लागला. 
क्रमश (इति विनोबा) 
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 

No comments:

Post a Comment